x
logo

केडीसीसी बँकेचा व्यवसाय पोहोचला रू. २१,३७१ कोटींवर
बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषदेत माहिती

वार्षिक ढोबळ नफा रू. २८७ कोटी, ठेवी रू. १२,३०९ कोटी

चालू आर्थिक वर्षासाठी रू. १५,००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट

कोल्हापूर, दि. २:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षातील म्हणजेच दि. ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल रू. २१,३७१ कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. बँकेचा या आर्थिक वर्षातील ढोबळ नफा रू. २८७ कोटी आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर या पंचवार्षिक मध्ये सर्वच पातळ्यांवर संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद संस्था आणि शेतकऱ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. बँकेकडे रू. १२,३०९ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने केलेली गुंतवणूक रू. ५,०३२ कोटी तर बँकेने वितरित केलेली कर्जे रू. ९, ०६२ कोटी आहेत. केंद्र कार्यालयासह बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा सलग नफ्यात असल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सन २०२६- २७ या येत्या आर्थिक वर्षातील म्हणजेच दि. ३१ मार्च २०२७ अखेरची उद्दिष्टे अशी……!

□ठेवी: १५, ००० कोटी

□ढोबळ नफा: ४०० कोटी

□ढोबळ एन. पी. ए. प्रमाण: तीन टक्केच्या आत

□नक्त एन. पी. ए. प्रमाण : शून्य टक्के

□शेअर्स वाढीचे उद्दिष्ट रु. २० कोटी

□सी. आर. ए. आर. प्रमाण: १४ टक्के

पी. एम. सूर्यघर मोफत वीज योजना सबंध जिल्हाभर प्रभावीपणे राबविणारी देशातील पहिली बँक…..!
मंत्री श्री. मुश्री म्हणाले, संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली “पी. एम. सूर्यघर योजना” सामाजिक दायित्वाच्या भावनेतूनच संपूर्ण जिल्ह्याभर घरोघरी राबविण्याचा प्रस्ताव बँकेच्या संचालक मंडळासमोर ठेवलेला आहे. बँकेचा प्रचलित व्याजदर १२ टक्के असताना केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून एक किलो वॅटसाठी सहा टक्के, दोन किलोवॅटसाठी सात टक्के आणि तीन किलो वॅटसाठी आठ टक्के एवढ्या कमी व्याजदराने ही योजना राबविणार आहोत. या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज संबंधितांना मोफत मिळेल. अनुदान वजा जाता सुरुवातीची तीन वर्षे साधारणता दरमहा वीज बिलाएवढाच हप्ता बसेल. त्यानंतर पुढील पंचवीस वर्षे दरमहा येणारे वीज बिल शून्य होईल. पर्यायाने, पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल. अशाप्रकारे केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सबंध जिल्हाभर व्यापक पद्धतीने “पी. एम. सूर्यघर मोफत वीज योजना” राबवणारी केडीसीसी ही सबंध देशातील पहिली बँक असल्याचेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कर्ज योजनेची कर्ज मर्यादा रु. ३०,००० वरून रू. ५०,००० हजार…..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, माता-भगिनींच्या स्वावलंबनासाठी बँकेने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने” तील पात्र लाभार्थी महिलांना व्यवसायाकरीता ३० हजार पर्यंतचे वैयक्तिक कर्ज ३६ महिने मुदतीने दहा टक्के व्याजदराने दिले आहे. या कर्जाचा मासिक हप्ता दरमहा ९६८ रुपये इतका आहे. यापूर्वी रु. तीस हजार रुपये कर्ज घेतलेल्या महिलांनाही त्यांच्या मागणीनुसार जादाचे रु. २०,००० कर्ज दिले जाणार आहे. या अर्थसाह्यामध्ये वाढ करून ते रू. ३०,००० ऐवजी रू. ५०, ००० कर्ज, ४८ महिने मुदतीने दहा टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. त्याचा मासिक हप्ता रू. १,२६८ रुपये असेल. या आर्थिक वर्षात बँकेने १६,७७५ पात्र महिलांना रू. ५० कोटी, ३३ लाख इतका अर्थपुरवठा केला आहे.

ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय. वापरासाठी अनुदान योजना……!
श्री मुश्रीफ म्हणाले, साखर कारखान्यांचे हंगाम तीन महिन्यांवर आलेले आहेत ही चिंताजनक बाब आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर झालाच पाहिजे. मी छातीठोकपणे सांगतो की, ऊस शेतीमध्ये ए.आय. चा वापर झाल्यास एकरी शंभर टनाहून अधिक उत्पादन मिळायलाच हवे. त्यामुळे साखर कारखानदारी पाच महिन्यांहून अधिक काळ चालेल. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी बँकेने एक कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना ऊस शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे त्यांनी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचे शिफारस पत्र बँकेकडे सादर करावे. शिफारस पत्र मिळतात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल. शेतकऱ्याला स्वतःचा एकही रुपया न खर्च करता ऊस शेतीमध्ये ए. आय. तंत्रज्ञान वापरणे आणि उत्पादन वाढ घेणे सुलभ होणार आहे.

स्वर्गीय आमदार पी. एन पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान योजना…..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, गेल्या वार्षिक सभेतील महत्त्वाच्या निर्णयानुसार ज्या विकास संस्थांनी जूनअखेर सभासदांच्या वसूलपात्र कर्जाची शंभर टक्के वसुली केली अशा संस्थांना पीक कर्जावरील व्याजदरात एक टक्के सूट देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १७० विकास सेवा संस्थांना व्याज परताव्याचा लाभ झाला असून एक कोटी, एकवीस लाख इतकी व्याज सवलत रक्कम वितरित करण्यात आली आहे. येत्या वार्षिक सभेसमोर दोन टक्के व्याज परताव्याचा विषय संचालक मंडळासमोर विचाराधीन असून त्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद केली आहे.

अपात्र कर्जमाफीतील ४४,७५९ शेतकऱ्यांना न्याय मिळेल…..!
अपात्र कर्जमाफीतील रक्कम रु. ११२ कोटीबाबत विचारले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले आहे की, याबाबत नाबार्डचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेच्या अध्यक्षांनी बसून चर्चेतून समन्वयाने तोडगा काढावा. प्रसंगी नाबार्डने याबाबत केंद्र सरकारशी सल्लामसलत करण्याच्या सूचना या निकालात दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही नाबार्डला पत्र लिहून चर्चेसाठी वेळ मागितली आहे. बँकेने शेतकऱ्यांच्या या लढ्यासाठी आतापर्यंत अडीच ते तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. दि. सहा मे २०२६ रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीत ४४, ७५९ शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि अपात्र झालेली रक्कम परत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

○ किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेने जिल्ह्यातील एकूण अडीच लाख कर्जदार शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षण दिले आहे. दि युनायटेड एशोरन्स कंपनीकडून विमा उतरविला असून आज अखेर ३१६ शेतकऱ्यांच्या वारसांना सव्वा सहा कोटी रुपये विम्याचा लाभ झालेला आहे.

○ बँकेशी संलग्न असलेल्या विकास सेवा संस्थांच्या गट सचिवांना बँकेने सन २०२५- २६ च्या नफ्यातून बक्षीस पगारापोटी दोन कोटी, सत्तर लाख रुपये तरतूद केली आहे.

○ व्यक्तिगत कर्ज पुरवठ्यांतर्गत आज अखेर १३ हजार, ९८० कर्जदार संस्था सभासदांना रू. ४७० कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे.

यावेळी माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते.

स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी केले.
………..

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व उपस्थित संचालक.

शंभर टक्के वसुली केलेल्या संस्थांना पीक कर्ज व्याजात पंचवीस टक्के सवलत

केडीसीसी बँकेचा विकास सेवा संस्थांना दिलासा

स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी

१७० विकास सेवा संस्थांना मिळणार सव्वा कोटी व्याज परतावा

कोल्हापूर, दि. २४:
जून -२०२५ अखेर पीक कर्जासह मध्यम मुदत व इतर सर्वच कर्जबाकीची शंभर टक्के वसुली केलेल्या विकास सेवा संस्थांना पीक कर्ज व्याजात पंचवीस टक्के सवलत देण्याचा निर्णय केडीसीसी बँकेने घेतलाआहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १७० विकास सेवा संस्थांना सव्वा कोटी रुपये व्याज सवलतीची रक्कम परत मिळणार आहे. या माध्यमातून विकास सेवा संस्थांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. बँकेने स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत हे धोरण निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ताळेबंदातील तरतुदीमधून ही रक्कम विकास सेवा संस्थांना वर्ग केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या केडीसीसी बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शंभर टक्के कर्जवसुली करणाऱ्या विकास सेवा संस्थांना व्याजात भरघोस सवलत देण्याची घोषणा केली होती. केडीसीसी बँक बँकेच्या स्तरावर पीक कर्जासाठी विकास सेवा संस्थांना चार टक्के व्याजाची आकारणी करते. त्यापैकी एक टक्का म्हणजेच आकारलेल्या व्याज रकमेच्या पंचवीस टक्के व्याज परतावा रक्कम विकास सेवा संस्थांना दिला जाणार आहे. बँकेचा थकबाकीवरील खर्च कमी करण्यासह विकास सेवा संस्थांना शंभर टक्के कर्ज वसुलीसाठी प्रोत्साहन देणे, कर्जाच्या परतफेडीमध्ये शिस्त लावणे, उर्वरित विकास सेवा संस्थांनी कर्ज वसुलीचे अनुकरण करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

या प्रोत्साहनपर व्याज सवलतीच्या मिळालेल्या रकमेतून विकास सेवा संस्थांना आर्थिक सक्षमता प्राप्त होणार आहे. त्या माध्यमातून संस्थांच्या स्वनिधीसह सभासद शेतकऱ्यांना लाभांश वाटप, प्रोत्साहनपर रक्कम देऊ शकतात. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीला या योजनेमुळे बळकटी येणार आहे

चालू वसुली वर्षासाठी दोन कोटींची तरतूद……!
याबाबत बोलताना बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विकास सेवा संस्थांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सबंध महाराष्ट्रात “स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान” ही अभिनव अशी योजना केडीसीसी बँकेने राबविली आहे. या योजनेच्या माध्यमातून बँकेकडून चालू वसुली वर्षासाठीही दोन कोटींची तरतूद केली जाणार आहे. दि. ३० जून २०२६ या वसुली वर्षाअखेर जास्तीत जास्त विकास सेवा संस्थांनी आपापल्या स्तरावर शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. त्यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक विकास सेवा संस्थांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना होईल.

केडीसीसी बँक राबविणार “आई” महिला पर्यटन धोरण

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

पर्यटन क्षेत्रामध्ये महिला सहभागाला मिळणार चालना

पर्यटन व्यवसायातील रू. १५ लाखापर्यंत कर्जाचा मिळणार व्याज परतावा

कोल्हापूर, दि. १:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्र शासनाचे “आई” हे महिला पर्यटन धोरण राबविणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. या धोरणामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये महिला सहभागाला मिळणार चालना मिळणार आहे. पर्यटन व्यवसायातील रू. १५ लाखापर्यंत कर्जाचा व्याज परतावाही मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत महिलांनी पर्यटन व्यवसायासाठी रू. १५ लाखापर्यंतचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जावरील व्याज परतावा हा बँक नियमाप्रमाणे पर्यटन संचालनालयाकडून दिला जाणार आहे.

या धोरणाची पंचसूत्री….
महिला उद्योजकता विकास

महिलांसाठी पायाभूत सुविधा

महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/ सवलती

प्रवास आणि पर्यटन विकास

अर्जदाराची पात्रता…..!
या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला कोल्हापूर जिल्ह्यातील असणे आवश्यक. लाभार्थीचे बँक खाते आधार लिंक असावे. संबंधित पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. व्यवसायात ५० टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच एलओआय दिले जाईल. त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे. व्यवसाय सुरू झाल्याच्या फोटोसह कर्जाची नियमित परतफेड आवश्यक.

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी…..!
बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र सरकारने महिला केंद्रीत असे महिला पर्यटन धोरण बनवलेले आहे. हेच धोरण केडीसीसी बँकेने जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या धोरणाच्या माध्यमातून महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग आणि त्यांच्या आर्थिक विकासाचा स्तरही उंचावेल. या धोरणाच्या माध्यमातून केडीसीसी बँक जिल्ह्यातील महिलांना नवीन उद्योगाकरीता व जुना व्यवसाय वाढविण्याकरीता प्राधान्य देणार आहे. मी व्यक्तीश: आणि केडीसीसी बँक सदैव आमच्या माता- भगिनींच्या पाठीशी आहोत.

योजनेअंतर्गत खालील व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

□ कॅरॅमॅन- राहण्यासाठी व प्रवासासाठी सुसज्ज फिरते वाहन.

□ टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी- प्रवास, निवास व संपूर्ण टूर पॅकेज सेवा पुरवणारी संस्था.

□ साहसी पर्यटन- जमीन, हवा, जल क्षेत्रावरील सहज पूर्ण व शारीरिक कष्ट घेणारे पर्यटन.

□ पर्यटक सुविधा केंद्र माहिती कक्ष- प्रवास आरक्षण सेवा, आपत्कालीन साह्य केंद्र.

□ कृषी पर्यटन केंद्र- शेती व ग्रामीण जीवनाचे अनुभव देणारी पर्यटन स्थळे.

□ होम स्टे- ग्रामीण होम स्टे, शहरी होम स्टे, थीम असलेले होम स्टे, होम स्टेचे नूतनीकरण

□ निवास न्याहारी- निवासासोबतच न्याहारीचा समावेश असणारी सेवा

□ रिसॉर्ट- निवास, मनोरंजन व विश्रांती यासाठी एकत्रित सुविधा

□ मोटेल- महामार्गाजवळ असणारी प्रवाशांसाठीची निवास स्थळे व उपाहारगृहे

□ रेस्टॉरंट: जेवणासाठी पूर्ण सेवा देणारे ठिकाण

□ टेंट- कापड किंवा कॅनव्हासचे तात्पुरते निवासस्थळ

□ ट्री हाऊस- झाडावर किंवा उंच जागी बांधलेली निवासव्यवस्था

□ व्होकेशनल हाऊस- व्यावसायिक कौशल्य, प्रशिक्षण व निवासाची सुविधा

□ पर्यटन व्हीला: पर्यटकांसाठी स्वतंत्र व्हीला स्वरूपातील निवास

□ वूडन कॉटेजेस- लाकडी व पर्यावरणपूरक घर

□ पॉड्स- छोट्या- तंत्रज्ञानावर आधारित एकट्या प्रवाशासाठी निवास

□ महाभ्रमण- एकाचवेळी अनेक स्थळे समाविष्ट असणारे गट पर्यटन

□ बीच शॅक- समुद्रकिनाऱ्यावर असलेली खाद्यपेय व विश्रांतीसाठी असलेली झोपडी व शेड

□ उपहारगृहे- छोटे व पारंपारिक जेवण देणारी खाद्यगृहे

□ फास्ट फूड- लवकर मिळणारे व सहज खाण्याजोगे खाद्यपदार्थ

□ महिला चलीत कॉमन किचन- महिला गटाद्वारे चालवलेली सामूहिक स्वयंपाकगृहे

□ कॅफे- कॉफी व हलक्या जेवणाच्या सुविधा असलेले ठिकाण

□ बेकरी- ब्रेडचे कुकीज व इतर बेक केलेले पदार्थ विक्रीचे ठिकाण

□ टूर ऑपरेटर- पर्यटकांसाठी संपूर्ण टूरचे आयोजन करणारी सेवा

□ ट्रॅव्हल एजंट- प्रवास आरक्षण, हॉटेल बुकिंग, विजा इत्यादी सेवा देणारे

□ टूर मार्गदर्शक- पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन करणारी व्यक्ती

□ क्रूज- पाण्यावर जल पर्यटन करणारे लक्झरी जहाज

□ टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी- प्रवास, निवास, संपूर्ण टूर पॅकेज सेवा देणारी संस्था

□ आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज- स्थानिक कला, वस्तू व हस्तकलेचे दर्शन व विक्रीचे ठिकाण

□ टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर- पर्यटक वाहतुकीसाठी वाहने पुरवणारी सेवा. ही वाहने रिक्षा बस चार चाकी सारखी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिकल वाहतूक सेवा

□ आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प- आदिवासी जीवनशैली व नैसर्गिक पर्यटन यांचे मिश्रण

□ मेडिकल टुरिझम- उपचारासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सेवा

□ वेलनेस सेंटर- मानसिक व शारीरिक तंदुरीसाठी सेवा देणारे केंद्र

□ आयुर्वेद योगा केंद्र- पारंपरिक भारतीय उपचार पद्धती व योगाभ्यास केंद्र

□ हँडीक्राफ्टर्स- हस्तकला कलाकार व स्थानिक कलाकाराकडून बनविलेल्या हस्तकला वस्तू

□ सुविनिअर शॉप- स्मरणिका विक्री करणारी दुकाने

□ कला व संस्कृती- स्थानिक लोककला, संगीत, नृत्य, संस्कृती यांचे सादरीकरण

□ स्थानिक उत्पादक विक्री केंद्र- स्थानिक शेतकी खाद्य व हस्तकला उत्पादने विक्रीसाठी केंद्र

□ धार्मिक स्थळी निर्माल्य व्यवस्थापन- मंदिरे व धार्मिक स्थळी निर्माण होणा-या जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन

□ प्रसाद विक्री करणारी दुकाने- अधिकृत व मान्यताप्राप्त प्रसाद विक्री दुकाने

□ विविध खाद्यपदार्थ विक्रेते- स्थानिक खाद्यपदार्थ विकणारे छोटे विक्रेते

□ इव्हेंट मॅनेजमेंट- पर्यटनाशी संबंधित विविध कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन.

के.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ९० टक्के

जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यात ८० टक्के वाटा के.डी.सी.सी. बँकेचा

के. डी. सी. सी. बँकेने शेती पीक कर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. ३० जून २०२५ अखेर पीककर्ज वसुली ९०.१४ टक्क्यांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यामध्ये 80 टक्के वाटा एकट्या के. डी. सी. सी. बँकेचा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील एकूण १९३७ विकास संस्थांच्या माध्यमातून २ लाख ६० हजार शेतकऱ्यांना सन २०२४-२५ या पीक हंगामाकरीता कर्ज वितरण केले होते. ३० जून २०२५ अखेर ₹ २५८७ कोटी वसूलपात्र शेती व पीक कर्ज रक्कमेपोटी एकूण ₹ २३३२ कोटी शेती व पीक कर्ज वसूल झालेले आहे.

याबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे म्हणाले, गेल्या वर्षीपेक्षा पीक कर्ज वसुली मध्ये वाढ झालेली आहे. शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या व सहकार खाते यांनी बँकेला कर्ज वसुलीसाठी मोलाचे सहकार्य केलेले आहे. तसेच, बँकेच्या सर्व संचालक मंडळानेही माहे मे व जूनमध्ये आपापल्या तालुक्यातील विकास सेवा संस्थांच्या वसुलीसाठी आढावा सभा घेऊन वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या पिक हंगामातसुद्धा बँकेने चांगल्या वसुलीची परंपरा कायम राखली.

याबद्दल बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, वास्तविक यावर्षीची वसुली ९७ ते ९८ टक्के होईल, असा आमचा विश्वास होता. परंतु; कर्जमाफीच्या अफवेमुळे किंवा कर्जमाफी होईल या विचाराने पीक कर्ज भरले गेले नाही. त्यामुळे आमची पीक कर्ज वसुली ९० टक्क्यांवरच थांबली. परंतु; सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. तसेच; मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीससाहेब यांनीही घोषणा केली आहे की, आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. परंतु; ही कर्जमाफी प्रामाणिकपणाने कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच देण्याबाबत आम्ही सहकारात काम करणारी सर्व मंडळी प्रयत्न करणार आहोत. कारण; यामुळे थकबाकीदार राहिले तरच कर्जमाफी होते आणि नियमित, प्रामाणिकपणाने कर्जफेड केली तर कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, अशी शेतकऱ्याच्या मनात झालेली समजूत काढून टाकण्याची गरज आहे. दरम्यान; असेच होत राहिल्यास बँकांवर आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांवर याचे फार मोठे गंभीर दुष्परिणाम होतील, असे माझ्यासारख्या बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्याला वाटते.

केडीसीसी बँकेच्या अनिष्ट दुरावा धोरणाने विकास सेवा संस्थांना दिलासा

संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित धोरण मंजूर

अनिष्ट दुरावा भरण्यासाठी बिनव्याजी १५ वर्षांची मुदत

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित अनिष्ट दुरावा धोरण मंजूर झाले. या सुधारित अनिष्ट दुरावा धोरणामुळे गावोगावच्या प्राथमिक विकास सेवा संस्थांना अर्थातच सभासद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर झाले. महत्त्वाचे म्हणजे विकास सेवा संस्थांचा अनिष्ट दुरावा भरण्यासाठी बँकेने बिनव्याजी १५ वर्षांची मुदत दिली आहे. गाव पातळीवर शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या विकास सेवा संस्था बंद पडून शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून बँकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कृषी क्षेत्राच्या पत धोरणासाठी गाव पातळीवर शेतकरी सभासद, विकास सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अशी त्रिस्तरीय रचना आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1931 सेवा संस्था आहेत, त्यापैकी 120 विकास सेवा संस्था अनिष्ट दुराव्यात आहेत. 120 सेवा संस्थांची अनिष्ट दुराव्याची एकूण रक्कम 104 कोटी रुपये आहे. या संस्थांचा अनिष्ट दुरावा वाढल्यामुळे संचित तोटा वाढतच आहे. परिणामी; स्व- भांडवल संपलेले असून संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

असे आहे धोरण…..?

□ बँकेच्या पॅनेलवरील चार्टर्ड अकाउंटंट्सद्वारे अनिष्ट दुराव्याच्या रकमेचे विशेष लेखापरीक्षण होऊन रक्कम होणार निश्चित.

□ अनिष्ट दुराव्यातील रकमेचे समान 15 हप्ते पाडणार.

□ बिनव्याजी रकमेचा दरवर्षी एक हप्ता विकास सेवा संस्थेने बँकेला भरावा लागणार.

□ यासाठी विकास सेवा संस्थेला व्यवसाय वाढविण्यासाठीचा विकास आराखडा तयार करावा लागणार.

अनिष्ट दुरावा म्हणजे काय?

गावोगावच्या शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठ्यासाठी विकास सेवा संस्था ही जिल्हा मध्यवर्ती बँक व शेतकरी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असते. शेतकरी हे विकास सेवा संस्थेचे सभासद असतात आणि विकास सेवा संस्था या बँकेच्या सभासद असतात. बँकेच्यावतीने विकास सेवा संस्थांना पतपुरवठा केला जातो. विकास सेवा संस्था शेतकरी सभासदाला पतपुरवठा करतात. शेतकरी सभासदाकडून येणे असलेल्या कर्जापेक्षा विकास सेवा संस्थेने बँकेला देणे असलेल्या कर्जाची रक्कम वाढल्यास, त्यावेळी या फरकाच्या रकमेला अनिष्ट दुरावा किंवा अनिष्ट तफावत म्हणतात.

अनिष्ट दुरावा वाढण्याची प्रमुख कारणे….!

□ एकाच गावात अनेक सेवा संस्था झाल्यामुळे व्यवसायवाढीला मर्यादा.

□ सभासदांकडून येणे असलेली थकबाकी.

□ संस्थांकडून मोठ्या प्रमाणात केलेल्या स्थावर गुंतवणुका.

□ मोठ्या प्रमाणातील व्यवस्थापन खर्च व वादविवादामध्ये न्यायालयीन खर्च.

□ दरम्यान: अपहारामुळे जास्त अनिष्ट दुरावा निर्माण झाला असल्यास अशा संस्था या सुधारित धोरणामध्ये पात्र ठरणार नाहीत.

यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, राजेश पाटील, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व इम्तिहाज मुन्शी आदी प्रमुख उपस्थित होते.

केडीसीसी बँकेत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना विमा धनादेशांचे वाटप

अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते १६ लाखांच्या धनादेशाचे वाटप…….

अपघाताने मृत आठ शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत स्वभांडवलामधून पीक कर्ज घेणाऱ्या अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविला होता. तसेच; बँकेने सन २०२५-२६ सालाकरिता न्यू इंडिया एशोरन्स कंपनी अंतर्गत ईमेड लाईफ इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विसेस- पुणे या कंपनीच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डधारक अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख विमासुरक्षेचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची तोशिस शेतकऱ्यांना लागू न देता बॅंकेने विमा हप्त्याची एक कोटींची ही रक्कम नफ्यातून भरली आहे. आत्तापर्यंत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना पाच कोटीहून अधिक विमा रक्कम मिळाली आहे.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा केडीसीसी बँकेचा आत्मा आहे. शेतातील कामे करताना सर्पदंश, विजेचा धक्का, औषध फवारणी, जनावरांचे हल्ले अशा विविध कारणांमुळे तसेच अपघाताने शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू होतात. अशा संकटग्रस्त परिस्थितीत त्यांच्या संकटग्रस्त कुटुंबाला हातभार लागावा म्हणून बँकेने प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपये विमासुरक्षेची योजना सुरु केली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत विठ्ठल हरी मगदूम- निढोरी, शिवाजी नाना पाटील- तारळे खुर्द, शिवाजी पांडुरंग अतिग्रे- लाटवडे, महेशकुमार देवगोंडा वंटे- गणेशवाडी, वसंत नाना पाटील- कसबा तारळे, सर्जेराव चंद्रकांत जांभीलकर- महाडिकवाडी, साऊबाई मारुती दंडवते- गोरंबे, बाळासाहेब बापू चौगुले- दारवाड या मृतांच्या वारसदारांना धनादेश देण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, राजेश पाटील, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व इम्तिहाज मुन्शी आदी प्रमुख उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
……..

कोल्हापूर: केडीसीसी बँकेच्या शेतकरी अपघात विमा सुरक्षा योजनेअंतर्गत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना विमासुरक्षा धनादेश देताना बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, राजेश पाटील, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व इम्तिहाज मुन्शी आदी प्रमुख.

ओडिशाच्या सहकार विभागांच्या अधिकाऱ्यांची केडीसीसीला अभ्यास भेट

अभ्यास सहकाराचा: बँकेच्या आर्थिक मापदंड व डिजिटल बँकिंग प्रणालीचे केले विशेष कौतुक

पुणेच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचे आयोजन……

ओडिशा सहकार लेखा परीक्षण संचालनालयाचा उपक्रम

ओडिशा सरकारच्या सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यास भेट दिली. पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्यावतीने या अभ्यासभेटीचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशा सरकारच्या सहकार लेखापरीक्षण व सहकार संचालनालयाच्या २५ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

या अभ्यास मंडळात ओडिशा सरकारच्या सहकार विभागाचे ऑडिट जनरल ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीजचे उपसंचालक अक्षय कुमार दलेल, संतोष कुमार जाली, भवानी शंकर पुष्पलक, निहार रंजन स्वेन, अनिल कुमार पालो, सुजित कुमार त्रिपाठी, श्रीमती शांतीलता भुयान, श्रीमती शुभश्री प्रियदर्शनी प्रधान, श्रीमती श्रद्धांजली बारीक, मृत्युंजय सत्पती, नरेश पानी, हरप्रसाद मोहंती, विश्वजीत साहू, संतोष कुमार साहू, विश्वकिशन बिस्वाल, अनिल कुमार नायक, रंकनिधी बेहरा, शिशिर कन्हार, दिलीप कुमार पृष्टी, अशोक कुमार पुहन, सुधांशू शेखर राऊत, वेणुधर लेंका, अविनाश बेहरा, एस. छायाकांता पात्रो यांचा समावेश होता.

या अभ्यास भेटीत बँकेच्या केंद्र कार्यालयासह शाखांमधील कर्मचारी संख्या, गुंतवणुकीचे धोरण, बचतगटांना केल्या जाणाऱ्या वित्तपुरवठ्याची सुरक्षा, किसान क्रेडिट कार्डविषयीची सविस्तर माहिती, व्याज परतावा, शेती कर्जाविषयी सविस्तर माहिती,
केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरण अभियानाची माहिती, साखर कारखान्यांना बँकेकडून होत असलेल्या वित्त पुरवठ्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी बँकेच्या कामकाजाविषयी विभागनिहाय सविस्तर माहिती दिली. श्री. दलेन म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून कृषी- औद्योगिक क्षेत्रात बँकेचे मोठे योगदान आहे. २००० साली एटीएम सुरू करणारी केडीसीसी ही देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक आहे. त्यापाठोपाठ एटीएम, सीईआरएम, मायक्रो एटीएम सेवा, मोबाईल बँकिंग, मोबाईल व्हॅन, स्वतःचे डाटा सेंटर, स्वतःचे सॉफ्टवेअर ही वाटचाल क्रांतिकारक आहे. गाव पातळीवर मायक्रो एटीएममार्फत बँकिंग व्यवहार या बाबी विशेष कौतुकास्पद आहेत. कुशल व्यवस्थापन व पारदर्शी कारभार याच्या जोरावरच अडचणीच्या परिस्थितीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे वाटचाल केलेल्या या बँकेचा आम्हा सर्वांना व सहकार क्षेत्राला अभिमान आहे. भारतातील सहकार चळवळ मजबूत आहे. विशेषता: पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक मजबूत आहे. केडीसीसी बँकेला भेट दिल्यानंतर याची प्रचिती आली. बँकेच्या माध्यमातून येथे शिक्षण संस्था, पर्यटन संस्था, क्रीडा संस्था, हॉटेल व्यवस्थापन आदी अभिनव उपक्रमांसाठी वित्त पुरवठा होत आहे. बँकेची ९२ टक्के कर्ज वसुली ही सहकार क्षेत्राला फारच अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

उपसंचालक अक्षय कुमार दलेल म्हणाले, केडीसीसी बँकेने आय. पी. डी. आय. बॉण्ड ही अभिनव योजना राबविली. अशी योजना महाराष्ट्रसह देशातील कोणत्याही बँकेत नसल्याचे कौतुकही त्यांनी केले.

चौकट …………
म्हणूनच प्रगतीपथावर……….
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचे प्रकल्प संचालक बी. किशोर म्हणाले, बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गरुडझेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही काटकसरीचा, पारदर्शी कारभार या जोरावर बँकेने साधलेली प्रगती नेत्रदीपक आहे. बँकिंगमधील दैनंदिन व्यवहारात उपयोगी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि कृषी क्षेत्रात ए. आय. तंत्रज्ञानासाठी फंड उभा केल्याबद्दल तसेच शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पिक कर्ज बिनव्याजी धोरण सर्वच बँकांना स्फूर्तिदायक आहे, असेही ते म्हणाले.

स्वागत सौ. श्वेता मांडवकर यांनी केले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रशासन विभागाच्या अधिकारी सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. करवीर पूर्वचे विभागीय अधिकारी शिवराज मगदूम यांनी आभार मानले.

केडीसीसी बँक करणार सोलर प्रकल्पांनाही अर्थ पुरवठा

संचालक मंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्पांना थेट आणि सहभागा अंतर्गत मुदती कर्जाचे धोरण


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोलर प्रकल्पांनाही अर्थ पुरवठा करण्याचे धोरण निश्चित केले आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सोलर प्रकल्पांना थेट आणि सहभागाअंतर्गत मुदती कर्जाच्या धोरणास संचालक मंडळांने मान्यता दिली आहे.

केडीसीसी बँकेमार्फत प्रामुख्याने शेतीसह साखर कारखाने, सूतगिरण्या, मार्केटिंग संस्था, पगारदार पतसंस्था यांना कर्ज पुरवठा केला जात आहे. दरम्यान; या धोरणाच्या माध्यमातून बँकेने सौर ऊर्जेसारख्या नवीन क्षेत्राबाबत अर्थसाहाय्याचा निर्णय घेऊन व्यवसायवाढीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत एकूण सात हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प राबवून सन 2025 या वर्षातील सुमारे 30 टक्के फिडरचे सोलरायझेशन करण्याचे उद्दिष्ट “मिशन 2025” महाराष्ट्र राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेले आहे. या मिशनमध्ये ०.५ ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प स्थापित केले जाणार आहेत. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे व्यवस्थापन महावितरणच्यावतीने केले जात आहे. सौर प्रकल्पामधून निर्मित वीज खरेदीचा महावितरणशी 25 वर्षांचा करार केला जातो. वीज खरेदी दर टेंडर पद्धतीने ठरतो. कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत म्हणून सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनेही अनुदान देण्याचे आणि तीन टक्के व्याज परताव्याचे धोरण घेतले आहे.

सूर्य हा ऊर्जेचा खजिना…!
याबद्दल बोलताना बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सूर्य हा संपूर्ण जगासाठी अपारंपारिक ऊर्जेचा अखंड स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. त्या भूमिकेतूनच त्यांनी सौर ऊर्जेला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय प्रवाहाचा एक भाग म्हणूनच सौरऊर्जा निर्मिती बरोबरच पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने केडीसीसी बँकेनेही सौर प्रकल्पांना अर्थसाहाय्य करण्याचे धोरण घेतले आहे.

केडीसीसी बँकेचे सोलर प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्याचे धोरण असे…….
□ सहकारी संस्था आणि कंपन्यांना होणार कर्जपुरवठा.

□ प्रकल्प उभारण्यासाठी बँक 80 टक्के कर्ज पुरवठा करणार व 20 टक्के स्वगुंतवणुकीची अट.

□ प्रकल्पासाठी महावितरणशी त्रिस्तरीय करार.

□ कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी केडीसीसी बँक अग्रणी बँक म्हणून काम करेल.

□ इतर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी बँक सहभागा अंतर्गत कर्जपुरवठा करेल.

□ एका प्रकल्पास साधारणतः 10 ते 16 कोटींची गरज. कर्ज परताव्याची मुदत नऊ वर्षे.

या बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी आणि दिलीप लोखंडे आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

केडीसीसी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार

–महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनची घोषणा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०२३ -२४ सालासाठी “कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक” पुरस्कार जाहीर झाला. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून बँकेचा हा गौरव झाला. असोसिएशनच्यावतीने पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ भगवंत कड, उपाध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी लेखी पत्राद्वारे बँकेचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.
*महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड -मुंबई यांच्यावतीने दरवर्षी सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँकांना पुरस्कार वितरण केले जाते. पुरस्कार वितरणाचे हे २६ वे वर्ष आहे. सन २०२२-२३ या आर्थिक सालासाठीही बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक हा विशेष पुरस्कार मिळाला होता.
“दृष्टीक्षेपात आर्थिक मापदंड……”
केडीसीसी बँकेच्या दि. ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षातील बँकेचे आर्थिक मापदंड असे………!
□ ढोबळ नफा: रू. २४५ कोटी
□ वसूल भाग भांडवल: ३०७ कोटी
□ ठेवी: १०, ६३५ कोटी
□ कर्जे: ७, ४२३ कोटी
□ खेळते भांडवल: १३, ३४६ कोटी
□ सी.आर.ए.आर.: १५. ८५ टक्के
□ नेट एनपीए: शून्य टक्के
□ ढोबळ एनपीए: ४.१८ टक्के
□ सर्वच म्हणजे १९१ शाखा नफ्यात
बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी स्वयंरोजगार व उद्योग- व्यवसायाच्या उभारणीसाठी ताराराणी अर्थसाहाय्य योजना ही अल्प व्याजदराची कर्ज योजनाही सुरू केली आहे. तसेच; बँकेने सभासद शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी- औद्योगिक क्रांतीमध्येही बँकेचे मोठे योगदान आहे. बँकेने तंत्रज्ञानातही मोठी गरुडभरारी घेतलेली आहे.

ई-लॉबी सुरू करणारी कोल्हापूर जिल्हा बँक राज्यात पहिली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा सहकारी बँकांमध्ये ई-लॉबी सुरू करणारी कोल्हापूर जिल्हा बँक ही राज्यातील पहिली बँक आहे. यामुळे ग्राहकांना अनेक सुविधा घरबसल्या मिळणार आहेत. असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खासगीकरण, उदारीकरणाच्या धोरणामुळे बँकिंग क्षेत्रात वेगाने आमूलाग्र बदल होत आहेत. यामध्ये टिकण्यासाठी बँकांनी सेवा आणि उत्पादन क्षेत्रात बदल घडविणे आवश्यक आहे. त्याकरिता बँकांनी आर्थिक शिस्त पाळत चांगल्या सेवा द्याव्यात, शाखा वाढवाव्यात आणि संगणकीकरण करावे तरच बँका स्पर्धेत टिकतील.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ई-लॉबी व नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. शाहूपुरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

केडीसीसी बँकेच्या संचालकपदी राजेश पाटील यांची निवड संचालक मंडळ बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी राजेश पांडुरंग पाटील यांची एकमताने निवड झाली. बँकेचे संचालक व आमदार कै. श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर एकमेव श्री. पाटील यांचा अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. संचालक मंडळाच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी त्यांचा सत्कार केला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था तालुका करवीर या प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून श्री. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सूचक म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ आणि आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी अनुमोदन दिले. या जागेसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला. अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्था उपनिबंधक श्री. नीलकंठ करे यांनी काम पाहिले.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांनी सलग ४० वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम केले. बँकेच्या प्रत्येक बैठकीला जातीनिशी उपस्थित असायचे. त्यांनी सदैव बँकेच्या आणि शेतकरी हितालाच प्राधान्य दिले. सभागृहाच्या ईशान्य कोपऱ्यातील त्यांची खुर्ची ठरलेलीच असायची. गेल्या तीन बैठका ही खुर्ची रिक्त होती. आज तीमध्ये त्यांचे सुपुत्र राजेश पाटील बसले. आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील म्हणाले, दिवंगत आमदार श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांचा सहकार- समृद्धीचा आणि शेतकरी हिताचा वारसा त्यांचे सुपुत्र राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवतील.
राजेश पाटील म्हणाले, वडील दिवंगत आमदार कै. श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांचा शेतकरी कल्याणचा वारसा जिल्हा बँकेच्या माध्यमातून मी मनापासून पुढे चालवीन.
यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते.

पालकमंत्री व केडीसीसी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांना बँकेच्या क्यू आर कोडचे वाटप केले.


छोट्या- मोठ्या दुकानदारांसह व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना सुविधा.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योग व व्यावसायिकांना क्यूआर कोड देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गडहिंग्लज शहरातील छोटे -मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांना क्यू आर कोड चे वाटप झाले. त्यानंतर दिवसभर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकाऱ्यांनी फिरून मुख्य बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, लॉन्ड्री, सलून, औषध विक्रेते व इतर व्यावसायिकांना क्यूआर कोडचे वाटप केले. यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी ही शेतकऱ्यांची बँक आहे. तसेच; क्यू आर कोड च्या दैनंदिन पिग्मी भिशीच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार, उद्योग, व्यवसायिक, उद्योजक, विक्रेते यांची नाळ बँकेशी घट्ट जोडली जाईल. बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या क्यूआर कोड मोहिमेत स्वतःला झोकून देऊन काम करावे. सुरुवातीला गडहिंग्लज शहर, त्या पाठोपाठ तालुक्यातील मोठी गावे आणि मग ग्रामीण भागात या पद्धतीने ही मोहीम यशस्वी केली जाईल. केंद्र कार्यालयात माहिती व तक्रार निवारण कक्ष……!

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बँकेने मोहीम हाती घेतलेल्या क्यूआर कोडचे ॲक्टिवेशन अवघ्या एक दिवसातच होणार आहे. त्याच्या चौकशी, माहिती देण्यासाठी आणि तक्रार निवारणासाठी केंद्र कार्यालयात एक स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे, माजी उपनगराध्यक्ष किराणअण्णा कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर, हरून सय्यद, सिद्धार्थ बन्ने, बाळासाहेब देसाई- मंचेकर, सदानंद पाटील, गुंडेराव पाटील, रश्मीराज देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.

कागल : पालकमंत्री व केडीसीसी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी स्वतः रस्त्यावर उतरत छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांना बँकेच्या क्यू आर कोडचे वाटप केले.


कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः रस्त्यावर उतरत केले क्यू आर कोड चे वाटप.
केडीसीसीचा क्यू आर कोड होणार एक दिवसात ॲक्टिव्ह.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योग व व्यावसायिकांना क्यूआर कोड देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये रस्त्यावर उतरून स्वतः उद्योजक व व्यावसायिकांना क्यूआर कोड वाटप केले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, लॉन्ड्री, सलून, औषध विक्रेते व इतर व्यावसायिकांना क्यूआर कोडची वाटप केले. शहरातील मुख्य बाजारपेठेत गैबी चौकापासून बस स्थानकापर्यंतच्या विविध विक्रेत्यांना या क्यूआर कोडचे वाटप झाले. यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी ही शेतकऱ्यांची बँक आहे शेतकऱ्यांची बँकेची घटना आहेच. तसेच; क्यू आर कोड च्या दैनंदिन पिग्मी भिशीच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार, उद्योग, व्यवसायिक, उद्योजक, विक्रेते यांची नाळ बँकेशी घट्ट जोडली जाईल. बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या क्यूआर कोड मोहिमेत स्वतःला झोकून देऊन काम करावे. कागल शहरासह तालुक्यातील मुरगुड, कसबा सांगाव, सेनापती कापशी, नानीबाई चिखली, बिद्री- बोरवडे, सिद्धनेर्ली, म्हाकवे, सावर्डे बुद्रुक आदी मोठ्या गावांमध्ये जाऊन येत्या दोन आठवड्यात क्यूआर कोड वाटपाचे उद्दिष्टे पूर्ण करावे. त्यानंतर उर्वरित ग्रामीण भागात जावे. माहिती व तक्रार निवारण कक्ष स्थापणार……..!

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बँकेने मोहीम हाती घेतलेल्या क्यूआर कोड च्या चौकशी, माहिती देण्यासाठी आणि तक्रार निवारणासाठी केंद्र कार्यालयात एक स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करणार आहोत. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

केडीसीसी बँकेला वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार नाशिकमध्ये समारंभात पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर, दि. ११: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार मिळाला. नाशिकमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमात बँकेच्या संचालिका सौ. श्रुतिका काटकर आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माजी रेल्वेमंत्री व भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या नव्या सहकार कायदा मसुदा समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश प्रभू, एमएससी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, श्रीमती शोभाताई अहिरे, असोसिएशनचे उपाध्यक्ष वसंत भुईखेडकर या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड -मुंबई यांच्यावतीने दरवर्षी सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँकांना या पद्धतीने पुरस्कार वितरण केले जाते. हे वर्ष पुरस्कार वितरणाचे २५ वे म्हणजेच रौप्यमहोत्सवी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होता. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता पुणे विभागातील विशेष पुरस्काराने केडीसीसी बँकेला गौरविण्यात आले. “मूल्यमापन आर्थिक मापदंडांचे……” या पुरस्कारासाठी केडीसीसी बँकेच्या दि. ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षातील मूल्यमापन झाले. दृष्टीक्षेपात बँकेचे आर्थिक मापदंड असे………!
ढोबळ नफा: रू. २०४ कोटी
सी. डी. रेशो: ८६ %
सी.आर.ए.आर.: १४ टक्के
नेट एनपीए: शून्य टक्के
सर्वच म्हणजे १९१ शाखा नफ्यात नाशिक: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुणे विभागातील वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू व एमएससी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते संचालिका सौ. श्रुतिका काटकर व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सहकारामुळे गोरगरिबांचे जीवनमान उंचावले पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ

७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त केडीसीसीत ध्वजारोहण कोल्हापूर, दि.१४: सहकारामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाचीही समाजात पत निर्माण झाली असून सहकारामुळेच गोरगरिबांची उन्नती झाली आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सहकारामधूनच तयार झालेली साखर कारखानदारी, बँकिंग, सूतगिरण्या, दूध संघ व इतर अनेक संस्था यामुळेच राज्यासह देशाची आर्थिक घडी मजबूत आहे. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणसाचे जीवनमानही उंचावले आहे. विशेषता: पश्चिम महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकाराचे योगदान मोठे आहे. सहकार चळवळ निकोप, पारदर्शक हवी. सहकाराचा स्वाहाकार होता कामा नये. यासाठी पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि नैतिकतेने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी संचालक मंडळातील प्रताप उर्फ भैया माने, विजयसिंह माने, सौ. स्मिता गवळी, कामगार प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालकांसह माजी संचालक असिफ फरास, युवराज गवळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे उपस्थित होते.

केडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमा लवकरच निविदा मागवून पगारदार खातेदारांसाठीही आणणार सामूहिक विमासुरक्षा योजना अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती.

पावणे तीन लाख शेतकऱ्यांची संपूर्ण विमा हप्ता रक्कम भरली बँकेने. कोल्हापूर, दि. २१: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या १८ ते ८५ वर्षांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार सभासद शेतकऱ्यांना अपघाती मृत्युपोटी दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरला आहे. विमा हप्त्याची एक कोटी, १९ लाखाची सर्वच रक्कम जिल्हा बँकेने भरली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बंधूंना कोणतीही तोशीस लागणार नाही. लवकरच निविदा मागवून जिल्हा बँकेकडे पगाराची खाती असलेल्या नोकरदारांसाठी ३० लाख रुपयांच्या सामूहिक अपघाती विमा सुरक्षेची योजना आणण्याचा निर्णयही बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झाला. शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेत समाविष्ट अपघातांच्या प्रकारांमध्ये रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत अपघाती मृत सभासदाच्या वारसाला दोन लाख रुपये भरपाई मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख, ८५ हजार, ८८० कर्जदार सभासद शेतकऱ्यांना या विमा सुरक्षेचे कवच लाभले आहे. कायमचे आणि अंशतः अपंगत्व आल्यासही शेतकऱ्याला या योजनेमधून भरपाई मिळणार आहे. कर्त्या कुटुंब प्रमुखाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शेतकरी कुटुंब उघड्यावर पडू नये, या उद्देशाने संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ईफको टोकियो जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीला धनादेश दिला. मुदत एक वर्षापर्यंत आहे. यावेळी बँकेचे संचालक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खासदार डाॅ. श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते. अशी आहे शेतकरी अपघात विमासुरक्षा योजना……. ● इफको-टोकीयो जनरल इन्शुरन्सच्या सहयोगातून अपघाती विमा योजना….. ● सेवा संस्थाकडील किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार असलेल्या एकूण दोन लाख, ८५ हजार, ८८० शेतकऱ्यांना विमा सुरक्षाकवच…… ● अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई……. ● कायम व अंशतः अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना त्या- त्या प्रमाणात भरपाई……. ● शेतकऱ्यांना तोशीस लागू न देता बँकेनेच उचलला आहे विमा हप्त्याचा भार….. कोल्हापूर -केडीसीसी बँकेच्या शेतकरी अपघात विमा योजनेच्या हप्त्याचा धनादेश शाखाधिकारी आशिष साळी व ऑफीसर अमोल सूर्यवंशी यांच्याकडे देताना बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी संचालक मंडळातील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खासदार डाॅ. श्रीमती निवेदिता माने , प्रताप उर्फ भैय्या माने, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केडीसीसी बँकेच्या प्रांगणात ध्वजारोहण

कोल्हापूर, दि.१५: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकेचे उपाध्यक्ष व आमदार राजूबाबा आवळे यानी ध्वजारोहण केले. यावेळी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुनशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, केंद्र कार्यालयासह कोल्हापूर शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. …………. कोल्हापूर: केडीसीसी बँकेच्या प्रांगणात बँकेचे उपाध्यक्ष व आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे व इतर प्रमुख.

इतर बातम्या आणि ठळक घडामोडी